|| Lahan Mulanchya Goshti Part 02 ||
यशाची गुरुकिल्ली
एक मनुष्य गावात भरणाऱ्या आठवड्याच्या बाजारातून खरेदी केलेले ताकाने भरलेले गाडगे डाव्या हाती, तर तुपाने भरलेले गाडगे उजव्या हाती घेऊन घरांकडे चालला होता. तेवढ्यात त्याला समोरून येणारा एक थोर साधू वाटेत भेटला. नुसते मस्तक वाकवून नमस्कार करून तो मनुष्य त्याला म्हणाला, “साधू महाराज आपण माज्यासंगे माझ्या घरी येता का? ज्यायोगे माझं जीवन यशस्वी होईल असा गुरोपदेश मला आपल्याकडून घ्यायचा आहे.” 44 यावर तो साधू म्हणाला, “गुरु-उपदेशासाठी धार्मिक विधींचे नुसते अवडंबर माजवून व त्यानंतर शिष्याच्या कानात एखादा मंत्र सांगून त्याचे जीवन यशस्वी होत नाही. मी तुझ्या हाती यशाची गुरुकिल्लीच देतो.
पण तत्पूर्वी तू माझ्या एका प्रश्नाचे उत्तर दे.””कोणता प्रश्न आपण मला विचारू इच्छिता, महाराज?” असे त्या माणसाने विचारले असता तो साधू म्हणाला, “असं समज, की आता या बाजारातील गर्दी कमालीची वाढली आणि तुझ्या दोन हाती असलेली दोन गाडगी घेऊन त्या गर्दीतून वाट काढणे ही गोष्ट अशक्य झाली, तर तुझ्या हातातील दोन गाडग्यांपैकी कोणते गाडगे तू फेकून देशील आणि कोणते एक गाडगे तू अतिशय सांभाळून नेशील?
“अर्थातच मी हे ताकाने भरलेले गाडगे टाकीन नाहीतर कुणाला तरी देऊन टाकेल आणि तुपाने भरलेले गाडगे दोन्ही हाताने घट्ट धरून घरी घेयून जाईल.”यावर तो साधू म्हणाला, “मग त्याचप्रमाणे जर तू फालतू वा कमी महत्त्वाच्या गोष्टींतून आपले लक्ष काढून ते महत्त्वाच्या गोष्टी साध्य करण्यावर पूर्णपणे केंद्रित करशील, तर त्या गोष्टी साध्य होऊन, तू आयुष्यात नक्कीच यशस्वी होशील.”
अपयशातून बोध
एक हजारांवर शोध लावणारे महान शास्त्रज्ञ एडिसन अगदी सामान्य कुटुंबात अत्यंत गरिबीत वाढले. संशोधनाची नवनवी स्वप्ने उराशी बाळगून त्यांनी ती साकारण्यासाठी अविश्रांत श्रम केले. त्यासाठी त्यांनी वृत्तपत्रे, मिठाई आगगाडीतून विकण्याचा धंदा केला. चालत्या आगगाडीच्या डब्यातच त्यांनी आपली प्रयोगशाळा स्थापन केली होती.
जेव्हा एडिसन सदुसष्ट वर्षांचा होता तेव्हा त्याच्या कारखान्याला आग लागली. लक्षावधी डॉलर्सची मालमत्ता त्यात जळून खाक झाली. आपल्या आयुष्यभराचे परिश्रम आणि कमाई आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असताना वृद्ध एडिसन म्हणाला, “विनाश सुद्धा मोठा मौल्यवान ठरतो बघा! त्यात आपल्या सर्व चुका जळून जातात बरं ! तेव्हा हे जे घडले त्यासाठी देवाचे आभारच मानले पाहिजेत. कारण आता नव्याने सुरुवात करण्याची संधी मिळत आहे, हे काय कमी आहे?
असा प्रचंड विनाश, मानसिक त्रास झाल्यानंतरही तीन आठवड्यांच्या आतच एडिसनने ‘फोनोग्राफचा शोध लावला. एकाच तारेवरून एकाच वेळी सहा संदेश पाठविण्याची पद्धती शोधून काढली. दोषरहित विजेचा दिवा शोधून काढला. अपयशातून बोध घेत घेत पुढे अनेक शोध त्याने लावले, जगातील सर्व यशोगाथा या मोठ्या अपयशांच्याही कहाण्या आहेत. इतरांच्यात व त्यांच्यात फरक एवढाच की प्रत्येक अपयशानंतर ही माणसे पुन्हा जोमाने उभी राहिली.हार पत्करुन निष्क्रिय राहिली नाहीत.
आईच्या हातचे जेवण
श्रीकृष्णांचे बालपण अगणित लीलांनी भरलेले आहे. कंसाचा वध ही त्याच्या बालपणातील एक महत्वाची घटना. दह्या दुधाची चोरी करणे पावा वाजवून सर्वाना मंत्रमुग्ध करणे या खोड्या तर नित्याच्याच होत्या. त्याचे चरित्र सर्वांनाच मुग्ध करणारे आहे. असो.
श्रीकृष्ण जेव्हा सोळा वर्षाचा झाला तेव्हा वसुदेवाने त्याला विद्यार्जनासाठी सांदीपनी ऋषींच्या आश्रमात पाठवले तेथे राहून तो गुरूंची मनोभावे सेवा करी. आश्रमातील त्यांनी नेमून दिलेली सर्व कामे चोख पार पाडी. त्याने अल्पावधीतच सर्व प्रकारच्या विद्या शिकून घेतल्या. त्याची कुशाग्र बुद्धिमत्ता पाहून हा जन्नजात ज्ञानी आहे आणि पूत्याचे मन राखण्यासाठी व गुरूची महती वाढविण्यासाठी शिक्षण घेत आहे ह्याची गुरुजींना जाणीव होती. कृष्णाची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्ञानी असूनही त्याच्या अंगी असलेली नम्रता. ती नम्रता पाहून सांदीपनींना परम संतोष वाटायचा.
कृष्णाचे अध्ययन पूर्ण झाल्यावर कृष्णा सांदीपनींचा निरोप घेण्यासाठी येतो तेव्हा ते म्हणाले, “कृष्णा! आशीर्वाद माग.” तेव्हा कृष्णा म्हणाला, “आचार्य, मी काय आशीर्वाद मागू? तो तुम्हीच द्यावा.” सांदीपनी म्हणाले, “तीच तर खरी गंमत आहे. तुझा अधिकार इतका मोठा आहे की, तुला काय आशीर्वाद द्यावा असा मलाच प्रश्न पडला आहे. तेव्हा माझा मान राखण्यासाठी तूच काय ते माग.” तेव्हा कृष्ण म्हणाला, “आईच्या हातच्या जेवणाची चवच वेगळी असते. ती आपल्या मुलांसाठी ज्या वात्सल्याने भोजन बनवते त्याला जगात उपमा नाही ती आपल्या बाळाला नुसते ताक, भात, भाजीच वाढत नाही तर त्याबरोबर प्रेमही वाढत असते. आपले मूल पोटभर जेवले म्हणजे स्वतः न खाताही तिचे पोट भरते. तिच्या चेहऱ्यावर समाधान पसरते.
आईच्या हातचे जेवण ही जगातील सर्वांत मोठी देणगी आहे. म्हणूनच मला शेवटपर्यंत माझ्या आईच्या हातचे जेवण मिळावे असा आशीर्वाद द्या. ते ऐकून स्वतः सांदीपनींचे हृदय आईच्या आठवणींनी भरून आले. त्यांचा कंठ सद्गदित झाला, डोळ्यांत पाणी तरळले आणि त्याच्या मुखातून एकच शब्द बाहेर पडला”तथाऽस्तू!” आपल्या अवतार कार्यात भगवान श्रीकृष्ण एकशे सोळा वर्षे जगले आणि त्यांच्या निर्वाणानंतर त्यांची आई गेली.