साद घरकाम करणाऱ्या स्त्रियांसाठी | Saad Gharkam Karnarya Shriyansathi..

|| साद घरकाम करणाऱ्या स्त्रियांसाठी ||

साद
साद

प्राचीन काळापासून आकाराने लहान मोठ्या असलेल्या राज्यात गावात आणि आर्थिक सुबत्ता असलेल्या घरात घरकाम करणारे नोकर दिसत आले आहेत. या घरकाम करणाऱ्या नोकरांमध्ये महिला व पुरुषांचा समावेश होतो परंतु महिलांची संख्या जास्त प्रमाणात दिसून येत होती. घरकाम काम करणाऱ्या महिला या पुनरुत्पादन करणारा एक घटक म्हणून पुढे आला आहे. पूर्वी राजवाड्यामध्ये खूप महिला कामगार दिसून येत होत्या. या महिला राजा व त्यांच्या प्रधान सरदार यांचे ही खाजगी किंवा वैयक्तीक काम सुध्दा करत असत. उदाः राजाच्या शयन कक्षात सुध्दा या महिला राजांची देखभाल करताना दिसून येत होत्या. यावरून असे निष्कर्ष येतात की ही गुलामाची किंवा नोकराची पध्दत ही जाणूनबुजून महिलांसाठी करण्यात आली आहे.

प्राचीन काळापासून आतापर्यंत घरकाम करणाऱ्या महिलांचे कामाचे स्वरूप जरी बदलले असले तरी त्यांच्या भूमिका व स्थान यामध्ये बदल झालेला दिसून येत नाही.औद्योगिक क्रांती उदयाला येताना बहुसंख्य लोक हे शेती वा शेतीशी निगडीत व्यवसायांशी जोडलेले होते. आणि कुटूंबातील प्रत्येक सदस्याच्या श्रमाच्या मिळकतीवर कुटूंब अवलंबून होते. त्या काळातील उच्चभ्रु स्त्रिया उत्पादन प्रक्रियेपासून खूपच दूर होत्या आणि श्रमिक वर्गातील स्त्रिया मात्र घरात आणि घराबाहेर ओझ्याच्या कामाखाली पिचलेल्या होत्या औद्योगिक क्रांती व भांडवलशाहीमुळे गरीब व श्रीमंत वर्गातील दरी वाढतच गेली. जे उच्चभ्रु वर्ग आहे ते विलासी जीवन जगत होते किंवा आहे, आणि गरीब वर्ण हा त्यांचा गुलाम म्हणून त्यांचा सेवक बनत गेला.

जागतिक कारणामुळे व भांडवलशाहीमुळे असंघटित क्षेत्रात वाढ झाली. वाढ होत असताना असंघटित क्षेत्रातील कामगारांना अनेक प्रकारच्या मूलभूत हक्क तसेच सामाजिक आर्थिक हक्कापासून वंचित राहावे लागते. असंघटीत क्षेत्रातील कामगारांमध्ये घरकाम करणाऱ्या महिला/ कामगारांचा समावेश होतो. घरकाम करणाऱ्या कामगारामध्ये महिला कामगाराची संख्या लक्षणीय आहे या महिला कोणत्याही सुरक्षतेशिवाय समाजातील लब्ध प्रतिष्ठ घरात मोलकरीण म्हणून नोकऱ्या करत आहेत. मुंबई पुणे सारख्या मोठ्या महानगरमध्ये घरात मोलकरीण ठेवणे काळाची तसेच प्रतिष्ठेची गरज बनली आहे परंतु अहमदनगर सारख्या निमशहरी शहरांमध्ये मोलकरीण ठेवणे तसे जिकीरीचे आहे पण आधुनिकतेच्या वान्यामुळे तसेच खोटी किंवा फसव्या प्रतिष्ठेसाठी नगर सारख्या निमशहरी भागात ही मोलकरीणींच्या संख्या वाढताना दिसत आहे.

नगरमध्ये डॉक्टर, वकील, मोठे व्यावसायिक, प्राध्यापक शिक्षक मोठे शासकीय नोकर या वर्गातील लोकाकडे घरकाम करण्यासाठी घरकाम महिला दिसत आहे. या महिला असंघटित असल्यामुळे त्यांचा कोणत्याच उल्लेख सरकारी दप्तरात आढळत नाही त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचे कायद्याचे तसेच सामाजिक आर्थिक संरक्षण मिळत नाही.भारतीय समाजव्यवस्थेत अशा अनेक जाती आहेत की त्यांच्या जातीला समुहाला स्वतंत्र जगण्याचा, शिक्षणाचा, पैसे कमवण्याचा अधिकारी नाकारला गेला आहे. आज जरी हे अधिकार नाकारण्याचे प्रमाणे मोठ्या महानगरामध्ये आणि शहरी भागात कमी झालेले पहायला मिळत असले तरी निमशहरी आणि ग्रामीण भागात आजही ते मोठ्या प्रमाणावर दिसून येते. भारतीय जातीव्यवस्थेचे पाळे मुळे खूप खोलवर रूजलेले आहे.

त्यामुळे उच्च वर्गातील मानसिकता अजूनही वर्चस्ववादी आहे. आज ही घरकाम करणाऱ्या महिलांचे प्रमाणे जर पाहिले तर बहुतेक महिला या मागासवर्गातील किंवा कनिष्ठ मानल्या गेलेल्या समाजातील आहे हे दिसून येते. जागतिकीकरण व भांडवलशाहीमुळे जे उत्पादन कामगार आहे किंवा ज्याकडे भांडवल उत्पादन प्रक्रियेत पूर्वी पासून आहे त्यांचे जीवन सुलभ सोयीस्कर झालेले दिसून येते हे होत असतांना उत्पादन प्रक्रियेपासून दूर गेलेले किंवा मागासवर्गीय समाजाचे लोक या मुख्य प्रवाहापासून दूर लोटले गेले आहे. खाजगीकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात बदल होत गेला ते होत असताना जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोक आहे ते या शैक्षणिक प्रणालीपासून दूरवत गेले.

नगर शहरांमधील घरकाम करणाऱ्या महिलांचा सर्वे केल्यानंतर असे निष्कर्ष समोर आले की नगर शहरामध्ये घरकाम करणाऱ्या महिलापैकी ५०% महिला स्थलांतरीत व विशिष्ट जाती वर्गाच्या आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळून ६५ वर्षे उलटून ही या समाजव्यवस्थेत बदल झाला नाही. नगर सारख्या निमशहरी भागात पुरेशी आधुनिकीकरणीची संकल्पना समजून न घेतल्याने या शहरांचा म्हणावा तेवढा विकास झाला नाही. त्यामुळे येथील असंघटित क्षेत्रातील कामगारांचे विशेषतः महिला कामगारांची घुसमट होताना दिसून येते. या महिला आपले घर चालविण्यासाठी घरकाम करत -पोचा असतात. या घरकामात त्यांना स्वयंपाक करणे, झाडूकरणे, भांडी घासणे, बाथरूम स्वच्छ करणे इ. गोष्टी कराव्या लागतात. या सर्व स्वच्छतेच्या गोष्टी करून ही या महिलांना मिळणारा पगार हा अत्यल्प स्वरूपाचा आहे.

त्यामध्ये त्यांना त्यांचा कुटुंबांचा खर्च करावयाचा असतो केंद्राच्या रोजगार हमी योजनेसाठी किंवा संघटित कामगारांसाठी जे वेतन मिळते त्याहीपेक्षा कमी वेतन या महिलांना मिळते त्यातच या महिला ज्या परिसरात राहत असतात तो भाग अस्वच्छ लहान-लहान पत्र्यांच्या खोल्या, गलिच्छ वस्ती, दाट लोकवस्ती या ठिकाणी त्यांचे वास्तव्य असते. अशा ठिकाणी राहत असताना त्यांना सतत आरोग्यांच्या समस्यांना सामोरे जावे लागत असे. या परिस्थितीत नव्या गोष्टींचा विचार करणे अथवा मुलांना दर्जेदार शिक्षण देवून या नरकयातनेतून मुक्ती मिळविण्याचे स्वप्न ती उराशी बाळगूण असते.

घरकाम करणाऱ्या महिलांना कामावर जाता मोठी कसरत करावी लागते तसेच एका कुटुंबाकडून मिळणारा पगार अत्यल्प असल्याने तिला अनेक घरामध्ये काम करावे लागते. त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील कामाची वेळ व त्याचा मिळकतीचा वेळ यांचा समन्वय साधला जात नाही. त्यामुळे अनेक वेळा घरमालकांकडून या महिलांचा अपमान होत असतो. या महिलांना कामावर घेताना कोणत्याही प्रकारचा करार किंवा त्यांना कायमचे घेतले जात नाही. त्याचबरोबर त्यांना वर्षे अखेरीस बढती देणे त्यांच्या पगारात वाढ करणे. या गोष्टी कोणता घर मालक करत नाही. त्यामुळे अशा महिलांना आपले शरीर जोपर्यंत साथ देते तो पर्यंत काम करावे लागते. त्यामुळे वृध्द अवस्थेत त्यांना व्याधींना सामोरे जावे लागते.

अशा घरकाम करणाऱ्या महिलांना आपल्या समाजाने कधी स्वीकार केला नाही त्यांना कायम दुय्यम तुच्छतेची वागणूक दिली आहे. त्यांना कधी आपण समाज संरचनेचा एक महत्वाचा घटक मानला नाही. त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन कायम पुरुषी असल्याचा जाणवतो. त्यासाठी आपल्या समाजाने त्यांना समाजाचा एक महत्वाचा घटक मानावा व त्यांना मुख्य प्रवाहात येण्याची संधी दयावी त्यांना कामाच्या ठिकाणी व कुंटुबातून होणाऱ्या अत्याचारापासून संरक्षण मिळणे गरजेचे आहे त्यांसाठी या महिलांना सघंटित करणे गरजेचे आहे.

तसेच त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा न आणता ह्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्यावे, त्यांना कायद्यांचे तसेच सामाजिक आर्थिक संरक्षण मिळणे गरजेचे आहे. तसेच या विषयांकडे उदारमतवादी दृष्टीकोनातून पाहणे आवश्यक आहे. आपल्या समाजाने त्यांना एक स्त्री म्हणून त्यांचे संरक्षण करणे आपले उत्तरदायित्व आहे असे समजून त्यांचे संरक्षण केले पाहिजे. व आपल्या मानसिकेत बदल केला पाहिजे.

Leave a Comment