|| साद घाली जीवा ||
‘साद’ हा भावपुर्ण शब्द मनाला भावुन जाणारा आहे. जसा ‘वेड लावी जीवा’ ही अक्षरे प्रेमाचा भाव सांगुन जातात, तसेच ‘साद घाली जीवा’ यामधील साद हा वात्सल्यपुर्ण शब्द आहे.कोकीळेची ‘साद’ जशी मनाला भावून जाते’ तसेच आईच्या सादेमध्ये व हाकेमध्ये ममतेचं अस्तित्व असते. त्यामध्ये प्रेमभाव, माया, ममता सामावलेली असते. मित्राच्या हाकेमध्ये व आरोळीमध्ये ‘मित्रत्व’ असते जी आयुष्याच्या वाटेवर अत्यंत महत्वाची असते. या सुंदर आयुष्याच्या रोजच्या शर्यतीत अनेक जण भेटतात काही मनात घर करून जातात तर काही हृदयात ! काही मात्र फक्त ‘हाक’ देतात, तर काही जन्मभर साथ. काहींना आपण विसरतो तर बहुतेक जण आपल्याला विसरतात परंतु एक हाक अशी असते ती कायमची साथ देते ती साद, ती हाक आपल्या कानामध्ये इतकी गुंजलेली असते की ती विसरणे कधीच अशक्यप्राय असते.
सोनेरी दिवसाची सुरुवात झाल्यापासून अस्त होइपर्यंत आईची ती आपल्या लाडक्या लेकराला ‘वात्सल्यपुर्ण साद अनेक जणांच्या नशिबात असते. परंतु ती ‘ममतापुर्ण साद’ माझ्या उर्वरीत आयुष्यातून अचानाक कुठे विरून गेली कळलेच नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी ती शेवटची वात्सल्याची ‘साद’ (हाक) मी कधीच विसरु शकत नाही. ती शेवटची ‘प्रेमळ’ साद मला झोपुन देत नाही हे तितकेच खरं ! अरे प्रेमाने कोणी आवाज देणारच राहिल नाही या आयुष्यात ! भुक लागली की मायेने जेवण करायला चल म्हणणारा तो आवाज गेला कुठे ? कधी चुकीची गोष्ट घडल्यावर राग येणारी परंतु डोळ्यांतील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उंचबळत असणारी ती ‘मातृसाद’ गेली कुठे ?
आयुष्याच्या वाटेवर व वळणावर मैत्रीपुर्ण हाक, साद, आरोळी देणारे काही जीवाभावाचे मित्र भेटतात. परंतु ‘साद’ देणारे खुप असतात, मात्र ‘साथ’ देणारे मोजकेच असतात. आपण निस्वार्थी वृत्तीने त्यांच्या खांद्यावर हात टाकून मदतीची व आनंदाची साद दिली की जीवन कसे सोनेरी होईल ना ! म्हणून तर मग या सुंदर जीवनाला अतीसुंदर बनवुया ती मित्रत्वाची, मायेची, प्रेमाची, मदतीची निष्ठेची, देशभक्तीची, प्रेमळ साद व साथ देवून .