|| Marathi Story For Kids ||
कणाकणांत परमेश्वर !
एका आश्रमात एक ज्ञानी पुरुष रहात होता. एक दिवस आपल्या शिष्यांना शिकविताना तो म्हणाला, “प्रत्येक प्राणिमात्रात परमेश्वर आहे. पुरूष स्त्री, पशू, पक्षी एवढेच काय? छोट्या जीवजंतूतसुद्धा परमेश्वर साकार आहे. म्हणून कशालाही घाबरू नये.शिष्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी हे बोलणे मनात ठेवले. एक दिवस एक ज्ञानवंत शिष्य आश्रमांतून शहरात गेला. तो आपल्याच तंद्रीत मग्न होऊन चालला होता. समोरून एक हत्ती पळत येत होता. त्यावर बसलेला माहूत ओरडत होता, “पळा, पळा, हत्ती वेडा झाला आहे. माझ्या ताब्यात तो येत नाही म्हणून आपला जीव वाचविण्यासाठी पळा !
माणसे आपला जीव वाचविण्यासाठी इकडे-तिकडे पळू लागली; पण शिष्य पळाला नाही. त्याने विचार केला. गुरूजींचा अमूल्य मंत्र माझ्याजवळ आहे. माझ्यामध्ये परमेश्वर आहे. आणि हत्तीमध्येही परमेश्वर आहे. मग परमेश्वरालाच परमेश्वराकडून काय भीती? म्हणून. तेथेच राहिला.माहूताने पुन्हा सावध केले, “हत्ती वेडा झाला आहे. पळा पण शिष्य हत्तीसमोर तसाच उभा राहिला. बिचाऱ्याहत्तीला हे माहीत नव्हते, की याला नवीनच ज्ञान मिळालेले आहे. त्याने आपल्या सोंडेमध्ये पकडून शिष्याला दूर फेकून दिले. शिष्याची हाडे मोडली. ज्ञानी पुरुष, शिष्याला आपल्या आश्रमात परंत घेऊन आले.
ज्ञानी पुरुषाने विचारले! “सत्शिष्या काय झाले?”तो म्हणाला, “एक वेडा हत्ती पळत होता. मी त्याला अजिबात घाबरलो नाही; कारण आपली शिकवण माझ्या मनात होती; पण त्या मूर्ख हत्तीने मला सोंडेत पकडून फेकून दिले. आपल्या शिकवणुकीनुसार मी त्याला परमेश्वर मानले; पण आपल्या परमेश्वराने माझी हाडे तोडली. आपला उपदेश चुकीचा आहे.”ज्ञानी पुरुष सहजपणे म्हणाले, “त्या हत्तीवर कोणी बसले होते का?”शिष्य म्हणाला, ” हत्ती वेडा झाला आहे. स्वतःला वाचवा. गुरुजी म्हणाले, “वेड्या, तू माहुतामधल्या परमेश्वराचे म्हणणे प्रथम ऐकायला हवे होतेस. माहुतामधला परमेश्वर हा हत्तीमधील परमेश्वरापेक्षा अधिक जागृत होता. तू सारासार विचार न करता मी सांगितलेले शब्द ध्यानात ठेवून बसलास. पण त्यामागे दडलेले रहस्य तुला कळले नाही. ‘ शिष्याला हे रहस्य आता कळले. ज्या प्राण्यातील जाणिवा. अधिक जागृत असतात, त्याच्यातील परमेश्वरही अधिक जागा असतो.
यासाठी माणसाचा शब्द नाही; तर त्यामागे दडलेला अर्थ समजला पाहिजे. सदैव सतर्क राहून विचाराने निर्णय घेतला पाहिजे.
कष्टाचे फळ
एक शेतकरी होता. त्याला चार मुले होती. चौघेही तब्बेतीने तगडे, पण फार आळशी होते. वडिलांच्या पैशावर मजा मारणे एवढेच काम त्यांना ठाऊक होते. त्यांच्या सवयी आणि आळशीपणामुळे शेतकऱ्याला फार काळजी वाटे. तो सतत विचार करी, आपल्यानंतर यांचे काय होणार ? तो त्यांना मार्गावर आणण्याचे मार्ग शोधत होता. खूपदा त्याने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला; पण त्यांच्यावर त्याचा काही परिणाम झाला नाही. एक दिवस त्याला एक कल्पना सुचली. त्याने चारी मुलांना बोलवून म्हटले, हे बघा, मी तुमच्यासाठी आपल्या शेतात धन पुरून ठेवले आहे. तुम्ही शेत खणून काढा आणि ते धन बाहेर काढून आपापसात वाटून घ्या. दुसऱ्या दिवशी चारी भावांनी शेत खणण्यास सुरुवात केली.
त्यांनी सबंध शेत खणले; पण त्यांना पुरलेले धन मिळाले नाही.निराश होऊन ते आपल्या वडिलांकडे आले. “बाबा, आम्ही सर्व शेतात पाहिले, पण आम्हाला शेतात गुप्तधन मिळाले नाही. आपण आमच्याशी खोटे तर बोलला नाहीत ना?” शेतकरी म्हणाला, “नाही मुलांनो, मी खोटं कशासाठी बोलू? गुप्त धन तर तेथेच आहे. आज मिळाले नाही, तरी ध्यानात ठेवा, कधीतरी ते नक्की मिळेल, कष्ट. कधी वाया जात नाहीत. आता तुम्ही शेताची एवढी छान मशागत केलीच आहे, तर आता माझ्याबरोबर चला. आपण पेरणीही करू. मग पितापुत्रांनी खूप कष्टपूर्वक शेतात गहू पेरला. त्या वर्षी पाऊसही छान झाला आणि शेतात गव्हाचे खूप पीक निघाले. शेतात डुलणारे सोन्यासारखे पीक पाहून चारी भाऊ फार आनंदी झाले.
वडिलांच्या देखरेखीखाली पीक कापून, त्यांनी ते बाजारात नेऊन विकले. तेव्हा त्यांना खूप पैसे मिळाले. वडिलांनी ते पैसे चारी मुलांमध्ये समान रीतीने वाटले आणि वडील म्हणाले- “मुलांनो, हाच तो खजिना आहे. जो तुम्हाला कष्ट केल्याने मिळाला. मी म्हणालो होतो ना, कष्ट कधी वाया जात नाहीत.”बाबा, आपण बरोबर सांगितलेत. माणसाने कष्ट केले पाहिजेत. माणसाने कष्ट करून मिळविलेले धन हे कुठल्याही खजिन्यापेक्षा कमी नाही. आम्ही आज प्रतिज्ञा करतो, आयुष्यात कधीही कष्टापासून मागे सरणार नाही.आपल्या कष्टाचे पैसे मिळाल्याने चारी भाऊ फारच समाधानी होते. त्यांनी नंतर आळस सोडून कष्ट करण्यास सुरुवात केली. आणि ते सुखाने जगू लागले.
सत्कृत्यांची फळे
गया तीर्थक्षेत्राच्या नदी किनारी, अनके विद्वान पंडित पिंडदानाचे धार्मिक कार्य पार पाडत असत. ते भरपूर दक्षिणा मिळणाऱ्या गिऱ्हाइकाच्या शोधात असत. एक फाटके कपडे घातलेला मारवाडी त्या पंडितांच्या मागे-मागे फिरून सांगत. “अहो, माझ्या वडिलांचं पिंडदान करून देता का? पण दक्षिणा म्हणून देण्यासाठी माझ्याजवळ पैसे नाहीत, परंतु बरोबर आणलेले काही लाडू मी तुम्हांला दक्षिणा म्हणून देऊ शकेन !” कोणत्याच पंडिताने हे लाडू न घेता त्याला प्रत्येकाने ‘चल हट’, म्हणून त्याला हाकलून दिले.
जवळच झाडाखाली एक सज्जन पंडित, अत्यंत प्रामाणिक व पैशाच्या मागे न धावणारा असा बसला होता. कोणी पैसे देई न देई, तरी तो लोकांची कार्ये पार पाडून समाज सेवा साधायचा. या पंडिताने त्या मारवाड्याचे म्हणणे ऐकले व म्हटले, “पैसे नसले तरी चालतील, पण एवढ्या लांबून येऊन तसेच परत तुम्ही जाऊ नका! मी करतो पिंडदान तुमच्या वडिलांचे!” सर्व धार्मिक विधी पार पंडल्यानंतर आपले लाडवांचे गाठोडे त्या पंडिताकाडे देत म्हटले, “हे थोडे लाडू ठेवून घ्या दक्षिणा म्हणून, मी निघून गेल्यावर तुम्हीच ते सोडून घ्या बरं का?” असे म्हणून मारवाडी निघून गेला.
चला लाडवांचा समाचार घेऊ, असे म्हणत पंडितजींनी लाडवाचे गाठोडे सोडले तर काय त्यात १९ सोन्याचे लाडू होते! पंडितजींना गहिवरून आले. तो मारवाडी शोधूनही त्यांना सापडला नाही आपल्या छोट्याशा कामाचां एवढं मोठं बक्षीस मिळावं ? आता तर त्या सज्जन पंडिताचे मन आणखी विशाल झाले व त्या पैशांतून गरिबांसाठी त्याने अनेक कामे केली. चांगल्या सत्कृत्यांची फळे पण चांगलीच मिळतात.