05 सुंदर मराठी बोधकथा | Best Marathi Bodh Katha

|| Best Marathi Bodh Katha ||

Best Marathi Bodh Katha
Best Marathi Bodh Katha

गणपतीची पृथ्वी प्रदक्षिणा

एके दिवशी देवसभेत वाद झाला.वादाचा विषय होता. यज्ञ पूजन,हवन इत्यादी धर्मकार्यामध्ये सर्वात आधी कोणाची पूजा करावी ? प्रत्येकाला हा सन्मान मलाच मिळावा. असे वाटत होते आणि त्यामुळे जो तो मी इतरांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे .हेच पटवून देण्याचा प्रयत्न करीत होता. शेवटी सर्वजण ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांनाच निर्णय देण्यास सांगितले. तेंव्हा ब्रम्हदेव म्हणाले तुमच्यापेकी  जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा करून सर्वप्रथम माझ्याकडे येईल तोच यज्ञयागादी कर्मामध्ये पूजेचा प्रथम मानकरी ठरेल.

ते ऐकून सर्व देव आपापल्या वाहनांवर बसून अतिवेगानें पृथ्वी प्रदक्षिणेस गेले. जो-तो आपापल्या वाहनाला वायुवेगाने दौंडवीत होता. गणपती मात्र तेथेच थांबला. आपली तुंदिलतनू सावरीत पिटुकल्या उंदरावर बसून पृथ्वी प्रदक्षिणा करणे शक्य नाही हे त्याला पक्के ठाऊक होते. यावर काय उपाय करावा, असा विचार करीत असताना त्याला एक युक्ती सुचली. त्यामुळे त्याला अत्यानंद झाला.

तो उंदरावर बसून ब्रह्मलोकातून थेट कैलासावर गेला. तेथे भगवान शंकर आणि माता पार्वती एकमेकांशी गप्पागोष्टी करीत होती. गणपतीला उंदरावर बसून दुडुदुडु येताना पाहून त्यादोघांना मोठी मौज वाटली. त्यांनी त्याला येण्याचे कारण विचारले. तेव्हा सर्व वृत्तान्त सांगून तो म्हणाला, “जो मुलगा आपल्या आईवडिलांचा मान राखतो, त्यांना नित्यनेमाने वंदन करतो, त्यांच्या आज्ञेचे पालन करतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य लाभते असे धर्मग्रंथात लिहिलेले आहे म्हणूनच मी आपणाला वंदन करण्यासाठी आलो आहे,” असे म्हणून त्याने या दोघांना नम्रपणे नमस्कार केला. उंदरावर बसून त्यांना सात प्रदक्षिणा घातल्या आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन ब्रह्मलोकी गेला.

त्यानंतर एकेक करून सर्व देवता ब्रह्मदेवाकडे गेल्या, तेव्हा सर्वांत आधी गणपती तेथे पोहोचला हे ऐकून थक्कच झाल्या. तो कोठेही गेलेला नाही अशी त्यांची ठाम समजूत होती. पण ब्रह्मदेवाने जेव्हा ‘गणपतीच प्रथम पूज्य आहे’ असा निर्णय दिला व ‘तो केवळ पृथ्वीच्याच नव्हे तर संपूर्ण ब्रह्मांडाच्या सात प्रदक्षिणा करून आला आहे’ असे सांगितले तेव्हा सर्व देव मोठ्या संभ्रपात पडले. त्यांनी ब्रह्मदेवास प्रश्न केला- “प्रभो, हे कसे शक्य आहे?” तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, “माता ही पृथ्वीस्वरूप आहे आणि वडील हे भगवान नारायणाचीच मूर्ती असतात. भगवान नारायणाच्या शरीरात सर्व ब्रह्मांड राहते.

या गणपतीने आपल्या आईवडिलांना वंदन करून त्यांना सात प्रदक्षिणा घातल्या आहेत. तेव्हा तोच आद्य पूजनीय आहे. त्यावर देवता काय बोलणार? ? त्यांनी गणपतीच्या बुद्धिचातुर्याचे मनः पूर्वक कौतुक केले. अशा प्रकारे आईवडिलांवर श्रद्धा ठेवल्याने गणपती प्रथम पूज्य झाला.

द्रोणशिष्य एकलव्य

महाभारतातील ही गोष्ट. एका डोंगराळ जंगलात भिल्लाचे राज्य होते. त्या भिल्लाचा हिरण्याधनू नावाचा राजा होता. त्या राजाला एक मुलगा होता, त्याचे नाव होते एकलव्य.एकलव्य लहानपणापासून बापाबरोबर शिकारीला जात असे. धनुर्विद्याची त्याला फार आवड होती. आपल्याला धनुर्विद्या चांगली यावी असे त्याला वाटे. त्याच्यासाठी तो नेहमी प्रयत्न करीत असे. कौरव- पांडवाचे गुरू द्रोणाचार्य, हे धनुर्विद्येत फारच पारंगत होते. ते आपल्या शिष्यांनाही तसेच पारंगत करीत.त्यांची ही कीर्ती ऐकून एकलव्य त्यांच्याकडे गेला व त्यांना म्हणाला, “गुरूजी, मला धनुर्विद्या शिकण्याची फार आवड आहे, मला ती कृपा करून शिकवा.” पण एकलव्य होता भिल्ल म्हणून द्रोणाचार्यांनी त्याला शिकविण्यास नकार दिला.

एकलव्य हिरमुसला होऊन परत गेला. तरीही एकलव्याने धनुर्विद्या शिकण्याचे आपले ध्येय सोडले नाही. रानात जाऊन त्याने झोपडी बांधली.मातीचा द्रोणाचार्याचा पुतळा तयार केला व तो रोज सकाळी  उठे पुतळ्याला नमस्कार करी, नेम धरून धनुष्यबाणाचा सराव करी. असे बरेच दिवस निघून गेले. एकलव्याला धनुर्विद्या आता चांगली येऊ लागली.एक दिवस कौरव-पांडव द्रोणाचार्यांसह त्या अरण्यात शिकारीस आले होते. त्यांच्यासमोर एक कुत्राही होता. तो जोराजोराने भुंकत होता. इतक्यात सरासर बाण येऊन त्याचे तोंड त्या बाणांनी जखडले गेले व त्याचे भुंकणे बंद झाले. हे पाहून त्या सगळ्यांना आश्चर्य वाटले.

बाण कोणी मारले हे पाहण्यासाठी तेपुढे निघाले. तो एक मोठा मातीचा पुतळा होता. त्या पुतळ्याजवळ धनुष्यबाण घेऊन एक मुलगा पाठमोरा उभा होता.कौरव पांडव द्रोणाचार्यांसह तेथे येऊन स्तब्ध उभे राहिले व तो मुलगा काय करतो ते पाहू लागले. तोच त्याने सर सर सर बाण सोडले व बाणाचा पूल उभा केला. हा हा म्हणता तो आकाशात जाऊन भिडला आणि नंतर एकाच बाणाने त्याने तो मोडून पण टाकला! १ दृश्य पाहून साऱ्यांना नवल वाटले. इतक्यात तो मुलगा पुतळ्याला नमस्कार करून म्हणाला, “गुरूजी, मी तुमच्या पायांवर ही फुले वाहतो.’ असे म्हणून त्याने भात्यातून एक बाण काढला. तो धनुष्यावर चढविला आणि दोरी अशा कौशल्याने ओढली की, बाण रानवेलीवरचा फुलांचा गुच्छ तोडून नेमका समोरच्या पुतळ्याच्या पायांवर येऊन पडला.

हे सारे दृश्य पाहून द्रोणाचार्याने रहावेना. ते स्वतः पुढे झाले. त्यांनी कौतुकाने त्या मुलाच्या पाठीवर हात ठेवला. आणि प्रेमाने विचारले, “बाळ, तू कोण?” एकलव्याने मागे वळून पाहिले व द्रोणार्यांना, नमस्कार करून तो म्हणाला “मी द्रोणशिष्य एकलव्य!”एकलव्याचे हे शब्द ऐकून द्रोणाचार्याना नवल वाटले. ते म्हणाले, “द्रोणाचार्य तर मी. मी तर तुला विद्या शिकविली नाही. “मग एकलव्याने मातीचा द्रोणाचार्यांना पुतळा दाखविला व मागे घडलेली सारी हकीकत त्यांना सांगितली. द्रोणाचार्य एकदम खुश होऊन म्हणाले, “शाब्बास! शिष्य असावा तर तुझ्यासारखा! श्रद्धा ठेवून एकनिष्ठेने सतत श्रम केल्यावर त्याचे फळ मिळायलाच हवे.” असे म्हणून एकलव्याला आशीर्वाद देऊन द्रोणाचार्य कौरव-पांडवांसह परत निघून गेले.

मृत्युसमयीचा उपदेश

सीतामातेच्या मुक्तीसाठी प्रभू रामचंद्रांनी प्रचंड वानरसैन्यासह लंकेवर स्वारी केली. त्या युद्धात दैत्यांचा प्रचंड नाश झाला आणि रावणही मरणोन्मुख होऊन पडला. तेव्हा श्रीरामांनी लक्ष्मणाला बोलावून घेतले व म्हणाले, “रावण हा महाज्ञानी, प्रकांडपंडित व महान शास्त्रज्ञ आहे. तेव्हा त्याच्या या अंतिम क्षणी त्याच्याकडून काही बोधपर गोष्टी जाणून घे.” प्रभूंच्या आज्ञेनुसार लक्ष्मण रावणापाशी गेला तेव्हा तो मृत्यूशी झुंजत होता. लक्ष्मण त्याच्यापाशी बसला आणि मोठ्या आदराने त्याला हाक मारली. ती ऐकताच रावणाने महत्प्रयासाने डोळे उघडले व लक्ष्मणाला पाहून मंदस्मित करीत म्हणाला,”हे जितेंद्रिय लक्ष्मण ! येथे कसे येणे केले?” तेव्हा लक्ष्मण म्हणाला, “महाराज, आपण ज्ञानी आहात. तरी माझ्यासाठी काहीतरी अमृततुल्य उपदेश द्या. ते ऐकून रावण म्हणाला, “हे वीरपुरुषा, तू अशा वेली.

आला आहेस की माझ्याच्याने काही बोलवतही नाही आणि मृत्यूची भयंकर वेदना असह्य होत आहे. तरी पण मी तुला निराश करणार नाही. या अवस्थेत मी तुला एकच मोलाची गोष्ट सांगतो. तिचें पालन केल्याने तुझा फायदाच होईल आणि तुझ्यावर कधीही पश्चात्तापाची वेळ येणार नाही. ती गोष्ट म्हणजे आजचे काम कधीही उद्यावर ढकलू नकोस, माझ्याकडे पाहा. मी शारीरिक व मानसिकदृष्टया प्रबळ होतो. माझ्याकडे अनेक शक्ती होत्या. मी गुणी होतो. कर्तृत्ववान व पेराक्रमीही होतो. मी अनेक सत्कृत्येही केली. म्हणून प्रत्यक्ष रामचंद्राच्या हातून मला मरण येत आहे. पण स्वर्गापर्यंत शिडी बांधणे आणि समुद्राच्या पाण्याला स्वादयुक्त व मधुर बनविणे हे दोन संकल्प मी पुरे करू शकलो नाही. ते काम मी त्वरेने उरकले असते तर अनेकांना त्याचा लाभ झाला असता.

पण तेच महत्वाचे कार्य मी उद्यावर सोपवीत गेलो, चालढकल करीत गेलो आमि त्यामुळेच निश्चित ध्येय गाठू शकलो नाही. आज मरणापेक्षाही ती सल मला अधिक बोचते आहे. त्या दिरंगाई बद्दल मी स्वतःला कधीही क्षमा करणार नाही. म्हणूनच माझे तुला निर्वाणीचे एकच सांगणे आहे की, आजचे काम उद्यावर टाकू नकोस. ओळस झटकून वेळेवर कार्य केल्यानेच कार्य सिद्ध होते?’ बोलता बोलता रावणाला धाप लागली. त्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या आणि साठलेले अश्रू कडेने ओघळून मातीत पडले. पुढील दोन-चार क्षणातच त्याचे प्राण अनंतात विलीन झाले. लक्ष्मणाने त्या ज्ञानी पुरूषाला मनःपूर्वक वंदन केले आणि जड पावलांनी आपल्या शिबीरात परतला.

 

Leave a Comment